पंढरपूर येथील श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिराच्या संवर्धनाचे व जिर्णोद्वाराचे काम पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली शासन निधीतून सुरू आहे. त्यामध्ये श्रीं.विठ्ठल रूक्मिणीमातेच्या गाभा-याचे संवर्धन आषाढी यात्रा 2024 पूर्वी करण्याचे प्रस्तावित आहे. तथापि, गाभा-यातील संवर्धनाचे काम करताना मुर्तीचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करणे आवश्यक असल्याने विठ्ठल रुक्मिणी दर्शन वेळेत बदल करण्यात आला आहे.याबाबत 12 मार्च रोजी बैठक घेऊन निर्णय घेण्यात आला होता. आज पासून विठ्ठल रुक्मिणीच्या गाभाऱ्यातील ग्रॅनाईट फरशी काढण्याचे काम सुरू असल्याने मूर्तीला इजा होऊ नये म्हणून मूर्तीच्या संरक्षणासाठी बुलेट प्रुफ काच बसवण्यात आली आहे.
विठ्ठल मंदिरातील सर्व चांदीकाम काढण्यासाठी 25 सदस्यीय समिती गठीत करण्यात आली असून या समितीच्या पर्यवेक्षणाखाली सर्व चांदी काढण्यात आली असून, मूर्तीच्या संरक्षणार्थ बुलेटप्रूफ काचेचे आवरण बसविण्यात आले आहे. आता, 18 मार्च पासून गर्भगृहातील ग्रॅनाईट काढण्याच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात करण्यात येत असल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.
मंदीराचे मुळ रुप कायम ठेवून जतन व संवर्धनाचे काम करण्यात येत असून, मंदीरात लावण्यात आलेल्या चांदीचे कामही नव्याने करण्यात येणार असून, मंदिरातील सर्व चांदी काढून दुरूस्ती करून पून्हा बसविण्यात येणार आहे. पुर्वीची चांदी काढून ती वितळवून आवश्यकतेनुसार भर टाकण्यात येणार आहे. या कामासाठी समिती नेमणूक करण्यात येणार आहे. तसेच या सर्व कामाचे संपूर्ण व्हिडीओ चित्रिकरण करण्यात येणार आहे. गर्भगृहातील कामासाठी 15 मार्च पासून पदस्पर्श दर्शन बंद करण्यात आले आहे. भाविकांसाठी सकाळी 11वाजेपर्यंत मुख दर्शन खुले ठेवण्यात आले आहे. पुढील दीड महिना विठ्ठल रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन हे बंद राहणार आहे.
Post a Comment
0 Comments